प्राजक्ता काळे यांच्या अथक प्रयत्नातून आणि मेहनतीतून आज भारतामध्ये बोन्साय या कलेला पुन्हा महत्त्व येऊ लागले आहे. पुन्हा त्याचा प्रसार होऊ लागला आहे. या प्रसारासाठी ‘बोन्साय नमस्ते’, या संस्थेची स्थापना झाली आहे.

बागकामाची लहान पणापासूनच आवड असणाऱ्या प्राजक्ता काळे यांना १९८४ मध्ये बोन्सायची ओळख झाली आणि त्या त्यामध्येच हरवून गेल्या. त्यांची उत्सुकता, उत्साह आणि त्यांचा अभ्यास याचे फळ म्हणजे आज उभी असलेली, ‘बोन्साय नमस्ते’, ही संस्था!

आज बोन्साय क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाव असलेल्या प्राजक्ता काळे यांनी, वडाच्या झाडाचे पहिले बोन्साय केले आणि आणि बोन्साय कलेला सुरुवात झाली आणि आज ‘बोन्साय नमस्ते’, या संस्थेकडे सुमारे ३ हजार बोन्साय आहेत.

प्राजक्ता काळे यांनी भारतामध्ये आणि भारताबाहेर प्रवास करून, बोन्सायची कला फुलविली. त्यामुळेच भारतातील बहुतेक सर्व प्रजातींचे बोन्साय तयार करण्यात आले आहेत.

प्राजक्ता काळे, यांनी जगभरच्या सर्व बोन्साय स्कूलचा अभ्यास केला असून, त्यांचा आपल्या कलेमध्ये समावेश केला आहे. इंडोनेशियाचे बोन्साय तज्ज्ञ रुडी नाजओन यांचे विशेष प्रशिक्षण त्यांना लाभले आहे.

कामिनी जोहरी, सुचेता अवदानी, मार्क डीक्रुझ आणि राहुल राठी, ही ‘बोन्साय नमस्ते’ची टीम असून, गिरीधर काळे यांनी या संस्थेला आपला भक्कम पाठींबा दिला आहे.

बोन्साय नमस्ते या संस्थेने बेबड ओहळ या मावळ तालुक्यातील गावामध्ये भव्य जागेमध्ये एक फार्म हाउस तयार केले असून, त्याच ठिकाणी बोन्साय तयार होतात. या फार्म हाउसला देश विदेशातील अनेक नामवंतांनी भेट दिली असून, दाद दिली आहे.

बोन्सायचा अभ्यास करण्याच्या निमित्ताने प्राजक्ता काळे आणि त्यांच्या सहकारी परदेशात फिरत असताना, त्यांना भारतातील बोन्साय या कलेविषयी, परदेशी कलाकार आणि तज्ज्ञांकडून फारसे समाधानकारक उद्गार ऐकायला मिळाले नाहीत. त्यामुळे त्यानी भारतामध्ये बोन्साय कलेमध्ये मोठे काम उभे करण्याचा निर्णय घेतला.

२००९ साली प्राजक्ता काळे आणि त्यांच्या सहकार्यांनी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने काम सुरु केले. बोन्साय मटेरियल तयार केले आणि त्यातून पुढे बोन्सायची निर्मिती केली. ज्यामुळे येत्या २२ ते २५ फेब्रुवारी २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोन्साय प्रदर्शन होते आहे.

‘बोन्साय नमस्ते’च्या सर्व तज्ज्ञांनी तयार केलेले एक हजारपेक्षा जास्त बोन्साय या ठिकाणी एकत्रित पाहायला मिळतील.