बोन्साय ही कला आणि शास्त्र असे दोन्हीही आहे, पण ते एक कौशल्याचेही काम आहे.
कोणतेही झाड पहिल्यापासून बोन्साय स्वरुपात नसते. ज्या झाडाचे बोन्साय करायचे, ते झाड अगोदर लावले जाते आणि नंतर त्याचे कुंडीमध्ये बोन्साय केले जाते.
जी झाडे बोन्साय केली जातात, तिच्या अगोदरच्या स्वरूपाला बोन्साय मटेरियल असे म्हंटले जाते. ही झाडे जमिनीमध्ये लावली जातात. त्यांचे सहा ते सात वर्षे संगोपन केले जाते. नंतर ही झाडे जमिनीतून काढून,ती बोन्साय करणाऱ्या जागेवर आणली जातात. ती कुंडीमध्ये लावली जातात आणि त्यांचे पुढच्या १ ते दीड वर्षामध्ये बोन्साय व्हायला सुरुवात होते.

झाड अगोदर मातीमध्ये कसे लावायचे. ते मातीमधून बाहेर कसे काढायचे. तिथून ते कुंडीमध्ये कसे लावायचे आणि तिथून पुढे त्याचे बोन्साय कसे करायचे, हे कौशल्याचे काम आहे. झाड पडू नये यासाठी काय करायचे. त्याला पाणी कसे द्यायचे. कोणती खते द्यायची. हे सुद्धा कौशल्याचे काम आहे.

हे कौशल्य शिकवून येते आणि हे कौशल्य शिकून घेतल्यास, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. प्राजक्ता काळे गेल्या ३५ वर्षांपासून, हे कौशल्याचे काम करीत आहेत. त्यांनी बागकामाची आवड जोपासताना, हे बोन्सायचे कौशल्याचे काम शिकून घेतले आणि पुढे स्वतःहून त्या त्यातील अनेक तंत्रे शिकत गेल्या. अनेक प्रयोग त्यांनी केले आणि त्यातून त्यांची कला वाढत गेली.

प्राजक्ता काळे म्हणतात, की शेतीबरोबरच हे बोन्साय मटेरियल तयार करण्याचे काम शेतकऱ्यांच्या घरातीक स्त्रियांनी केले, तर एक मोठा शेतीपूरक उद्योग तयार होऊ शकतो. शेतीच्या बांधावर शेतकरी स्त्रिया, हे बोन्साय मटेरियल तयार करू शकतात. त्यामुळे शेतीला कोणतीही बाधा येत नाही. हे कौशल्य प्रशिक्षण शेतकरी स्त्रीयांना देता येऊ शकेल.

बोन्साय मटेरियल तयार झाल्यानंतर, त्याचे बोन्सायमध्ये रुपांतर करण्याचेही कौशल्य आहे. झाडांची आवड असणाऱ्या तरुण तरुणींना याचे कौशल्य प्रशिक्षण दिल्यास, बोन्सायची कला मोठ्या प्रमाणावर वाढीस लागेल. तसेच शेती शास्त्राची पदवी घेतलेल्या अनेक तरुणांनाही, यासाठी मोठा रोजगार उपलब्ध होईल. त्यासाठी फलोत्पादन क्षेत्रातील नवी शाखा विकसित होऊ शकेल. बोन्सायची वाढ, त्याची खते. त्यासाठी वातावरण कसे तयार करता येऊ शकेल, अशा अनेक गोष्टी नव्याने विकसित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी नवे कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे.