‘बोन्साय’, या कलेचा आता भारतामध्ये प्रसार सुरु झाला असून, त्याद्वारे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

‘बोन्साय’, ही खरे तर भारतीय कला आहे, पण आता ती भारतात दिसत नाही, तर जपान आणि चीनमध्ये दिसते आणि तिथे या कलेने मोठा रोजगार निर्माण केला असून, व्यवसायही मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.

‘वामनवृक्ष कला’, या नावाने पूर्वी प्रसिद्ध असणारी कला, बौद्ध भिक्षुंबरोबर भारताबाहेर गेली. जपानमध्ये टी मोठ्या प्रमाणावर दिसते. चीनमध्येही या कलेचा विस्तार झाला असून, एका अंदाजानुसार दर आठवड्याला सुमारे एक लाख बोन्साय मटेरियलची निर्यात चीनमधून, परदेशात केली जाते.

युरोपमध्ये बोन्सायला खूप मागणी आहे. १९ व्या शतकामध्ये जपानमधून ही कला बाहेर गेली आणि संपूर्ण जगाला माहित झाली. आता फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये याची मोठी प्रदर्शने भरतात. खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होते. विसाव्या शतकामध्ये, ही कला भारतामध्ये पुन्हा परतली.

२२ ते २५ फेब्रुवारी २०१८ मध्ये पुण्यात बोन्सायचे भारतातील आजपर्यंतचे सर्वांत मोठे प्रदर्शन भरत आहे. त्या ठिकाणी जगभार्तील १६ देशांमधील बोन्साय कलाकार येणार असून, जागतिक स्तरावर आदानप्रदान होणार आहे. यामुळे बोन्सायला मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये चालना मिळणार आहे.

बोन्सायचा, ‘कुशल भारत’, या उपक्रमामध्ये एक कौशल्य म्हणून समावेश व्हावा, यासाठी ‘बोन्साय नमस्ते’, या संस्थेतर्फे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहे. याचा समावेश झाल्यानंतर महारष्ट्रात आणि देशात, बोन्सायचे कौशल्य प्रशिक्षण केंद्रे तयार होतील. तेथे शिकविण्यासाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक असेल. बोन्सायचे कौशल्य आत्मसात केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ निर्माण होईल आणि रोजगाराच्या मोठ्या संधी तयार होतील.

बोन्साय मटेरियल तयार करणे, प्रत्यक्षात बोन्साय तयार करणे, त्यांची निगा राखणे, बोन्सायची शास्त्रशुद्ध माहिती देणे आणि त्याचा उपयोग करणे, अशा विविध प्रकारचा रोजगार निर्माण होऊ शकेल.

बोन्सायची गरज वाढतच जाणार आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी, दुर्मिळ होत जाणाऱ्या प्रजाती वाचविण्यासाठी, कॉर्पोरेट क्षेत्रात सजावट म्हणून, औषधी उपयोगासाठी, बोन्सायची उपुक्तता वाढत आहे.

या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर निर्यातही होऊ शकेल. त्यामुळे शेती पूरक उद्योग म्हणूनही, याचा विस्तार होऊ शकतो. तसेच तरुण तरुणींना, रोजगाराचे नवे दालन उघडले जाऊ शकते.